मुंबईत आयुष्यभर कष्ट, कोल्हापुरात स्वप्नातील घर; पण आठवड्यातच काळाचा घाला
05 Jun 2026 92 Viewsकोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुंबईत अनेक वर्षे कष्ट करून गावी नवीन घर बांधणाऱ्या एका कुटुंबाचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेत पती-पत्नीसह त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक चांदे (39), पत्नी शोभा चांदे (35), मुलगा जय (10) आणि मुलगी पूर्वा (7) हे मूळचे आजरा तालुक्यातील व्होन्याळी गावचे रहिवासी होते. कामानिमित्त ते मुंबईत राहत होते. दीपक चांदे यांनी मेहनतीच्या जोरावर गावी नवीन घर बांधले होते. उन्हाळी सुट्ट्यांमुळे संपूर्ण कुटुंब नव्या घरात राहण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे या घरात त्यांचे अवघे आठ दिवसच वास्तव्य झाले होते.
5 जून रोजी मुंबईला परतण्यापूर्वी नातेवाईकांना भेटण्यासाठी हे कुटुंब दुचाकीवरून दुंडगे गावाकडे निघाले होते. मात्र उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टेम्पो रस्त्यालगतच्या नाल्यात पलटी झाला. या अपघातात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे आजरा तालुक्यावर शोककळा पसरली असून, नव्या घराचे स्वप्न पूर्ण होताच संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.