रस्त्यावरील खड्ड्याने घेतला महिलेचा जीव मॅनहोल दुर्घटनेनंतर पुन्हा संताप

03 Jul 2026    910 Views

बदलापूर : राज्यात पावसाळ्याची सुरुवात होताच रस्त्यांवरील खड्डे पुन्हा एकदा जीवघेणे ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईतील झाड कोसळून ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू आणि साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५३ वर्षीय नागरिकाचा मृत्यू या घटना ताज्या असतानाच, आता बदलापूरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गणपती दर्शनावरून परतताना काळाने घातला घाला

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणा कुलकर्णी या आपल्या मुलासोबत दुचाकीवरून टिटवाळा येथे गणपती दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन आटोपून दोघेही बदलापूरकडे परतत असताना जांभळे गावाजवळील पुलावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक मोठा खड्डा आला. पावसामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी चालवत असलेल्या मुलाने अपघात टाळण्यासाठी तातडीने ब्रेक लावला.

अचानक ब्रेक लागला आणि घडला भीषण अपघात

अचानक ब्रेक लागल्यामुळे दुचाकीचा तोल गेला. मागे बसलेल्या अरुणा कुलकर्णी रस्त्यावर जोरात कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.राज्यात पावसाळा सुरू होताच अनेक शहरांतील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा समोर येऊ लागली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी मोठा धोका ठरत असून, अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघात घडत आहेत. बदलापूरमधील ही घटना देखील अशाच निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण मानली जात आहे.या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याच्या दाव्यांनंतरही प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचे सांगत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.