अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

12 Jun 2026    93 Views

अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि दैवी शक्तींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यभरात चर्चेत असलेल्या या हाय-प्रोफाइल प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत आता ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशातील नामांकित सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची एन्ट्री झाली आहे. राज्य शासनाने या प्रकरणात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून नियुक्ती केली आहे.

अशोक खरात स्वतःला सिद्धपुरुष, अंकशास्त्रज्ञ आणि अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करत होता. मात्र, महिलांना दैवी शक्तींची भीती दाखवून तसेच विविध धार्मिक विधींच्या नावाखाली त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. पीडित महिलांनी पुढे येत तक्रारी दिल्यानंतर नाशिक पोलिसांनी खरातला अटक केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला.

एसआयटीने तपासादरम्यान अशोक खरातच्या कार्यालय, निवासस्थान आणि फार्महाऊसवर छापे टाकले. या कारवाईत पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले. महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे 100 हून अधिक कथित अश्लील व्हिडिओ तपास यंत्रणेला मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमधून अनेक महिलांना फसवून आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

खरातविरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, अंमली पदार्थांचा वापर तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास यंत्रणा या प्रकरणातील प्रत्येक पैलूची सखोल चौकशी करत असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अशोक खरातचे अनेक राजकीय नेते तसेच मंत्रालयातील काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंध असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई बॉम्बस्फोट, 26/11 दहशतवादी हल्ला यांसारख्या संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारची बाजू यशस्वीपणे मांडणारे निकम आता या प्रकरणात न्यायालयात सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.