शेळ्यांची काळजी घ्यायला गेले, पण काळानेच घाला घातला; भिंत कोसळून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू
13 Jun 2026 92 Viewsछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने एका कुटुंबावर काळाचा घाला घातला. आडगाव खुर्द येथे शेतातील शेडची भिंत कोसळून बाप-लेकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला सात वर्षांचा पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांची नावे ताराचंद हिरालाल जोनवाल (वय ५०) आणि त्यांचा मुलगा अनिकेत ताराचंद जोनवाल (वय १३) अशी आहेत. तर आरुष शिवलाल जोनवाल (वय ७) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी ताराचंद जोनवाल हे आपला मुलगा अनिकेत आणि पुतण्या आरुष यांच्यासह शेतातील शेडमध्ये ठेवलेल्या शेळ्यांची पाहणी करण्यासाठी गेले होते. शेळ्या सुरक्षित आहेत का, याची खात्री करण्यासाठी ते शेडमध्ये थांबले असतानाच जोरदार वाऱ्यामुळे शेडची भिंत अचानक कोसळली.
भिंत कोसळताच तिघेही ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नांनी तिघांनाही ढिगाऱ्याखालून बाहेर काढून फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर ताराचंद जोनवाल आणि त्यांचा मुलगा अनिकेत यांना मृत घोषित केले.
या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे अनिकेत हा ताराचंद जोनवाल यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. घरातील कमावता पुरुष आणि एकुलता एक मुलगा या दोघांचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालयात आणि गावात पत्नी व मुलींचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.
दरम्यान, वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.