गडकरी-फडणवीस नव्हे अर्थमंत्रिपदासाठी 'या' नेत्याची जोरदार चर्चा

04 Jul 2026    98 Views
नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक बदल लक्षात घेऊन भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यात नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत सरकार आणि संघटनेतील संभाव्य बदलांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, या फेरबदलात काही विद्यमान केंद्रीय मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात, तर संघटनेतील काही नेत्यांना केंद्र सरकारमध्ये संधी मिळू शकते. विशेष म्हणजे, केंद्रीय अर्थमंत्रिपदासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेले गोयल अर्थविषयक ज्ञान आणि अनुभवामुळे या पदासाठी सक्षम मानले जात आहेत.

दरम्यान, विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युवा वर्गात असलेली त्यांची लोकप्रियता त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते.

याशिवाय, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे नावही संभाव्य मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचे वृत्त आहे. पंजाबमधील तरुण चुग यांनाही संधी मिळू शकते, तर राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण करणारे हरदीप सिंह पुरी आणि बी. एल. वर्मा यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही वरिष्ठ मंत्र्यांची राज्यपालपदी नियुक्ती होण्याचीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, एनडीएतील मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळ विस्तारात प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी एखाद्या नेत्याला संधी मिळू शकते. तसेच जनता दल (युनायटेड) ला अधिक प्रतिनिधित्व मिळावे, अशी भूमिका पक्षप्रमुख नीतीश कुमार यांनी घेतल्याचे बोलले जात आहे.

मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत किंवा संभाव्य खातेवाटपाबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा या राजकीय वर्तुळातील शक्यतांवर आधारित आहेत.