सुषमा अंधारेंचा मोठा दावा 'एका खासदाराचा मला फोन आला दोन जण पक्ष फोडत आहेत
17 Jun 2026 92 Viewsमहाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संभाव्य फुटीची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही खासदारांवर गंभीर आरोप करत मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. पक्षफोडीच्या कथित मोहिमेमागे काही खासदार सक्रिय असून त्यामध्ये संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांची प्रमुख भूमिका असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी थेट नावं घेत आरोपांची सरबत्ती केली. त्या म्हणाल्या की, पक्षात फूट पाडण्याच्या संपूर्ण मोहिमेचे कॅप्टन संजय देशमुख आहेत, तर नागेश पाटील आष्टीकर हे व्हाइस कॅप्टनची भूमिका बजावत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या दोघांच्या हालचालींवर पक्ष नेतृत्वाचे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.
अंधारे म्हणाल्या की, नागेश पाटील आष्टीकर हे जाणीवपूर्वक सर्वांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. ते स्वतःला अतिशय हुशार समजत असले तरी त्यांच्या आणि संजय देशमुख यांच्या सातत्याने सुरू असलेल्या बैठका, जेवणावळी आणि अलीकडेच झालेल्या फोन कॉलमुळे त्यांच्या हालचालींची माहिती पक्ष नेतृत्वाला मिळाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एका खासदाराने मला आणि पक्ष नेतृत्वाला फोन केला होता. त्यातूनही अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, देशातील विविध प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. काही लोकांना वेगळे काढून त्यांचा स्वतंत्र गट तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर त्या गटाच्या माध्यमातून भाजपला पाठिंबा मिळवण्याची रणनीती आखली जात आहे. प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केले जात असून निधीची आमिषे दाखवली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांवरही सुषमा अंधारे यांनी भाष्य केले. त्यांनी दावा केला की, पुण्यात आलेल्या एका चार्टर विमानातून काही महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी एकत्र आले होते. या बैठकीत ओमराजे निंबाळकर यांच्यासह काही अन्य नेत्यांचाही सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे अंधारे म्हणाल्या.
याचवेळी त्यांनी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचाही उल्लेख केला. या प्रकरणाचा निकाल लवकरच लागणार असून त्यासंदर्भात काही राजकीय आश्वासने देण्यात आली आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र या आरोपांबाबत संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
शेवटी सुषमा अंधारे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना आवाहन केले. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेले मत हे शिवसैनिकांच्या मेहनतीचे आणि जनतेच्या विश्वासाचे असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना फुटीच्या चर्चेत असलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे आवाहन केले. त्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येत असून येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.