कस्टोडीयल डेथ प्रकरणात 9 पोलिसांना जन्मठेप बेग्या पवार मृत्यू प्रकरणी वाशिम न्यायालयाचा मोठा निर्णय

02 Jul 2026    911 Views

हिंगोली/वाशिम : कस्टोडीयल डेथ (पोलीस कोठडीतील मृत्यू) प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निकाल देत नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे पोलीस कोठडीत होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील वाढोना गावातील रहिवासी बेग्या पवार यांना चोरीच्या संशयावरून रिसोड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना रिसोड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. आरोपानुसार, कोठडीत असताना बेग्या पवार यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या बेदम मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे (CID) सोपविण्यात आला. तपासादरम्यान पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे संबंधित पोलिसांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर वाशिम जिल्हा न्यायालयाने नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

बेग्या पवार यांचे कुटुंब हिंगोली जिल्ह्यातील वाढोना गावात वास्तव्यास असून त्यांचे वडील नैनू पवार आणि आई कालाबाई पवार यांनी न्यायासाठी दीर्घकाळ लढा दिला. अखेर न्यायालयाच्या या निकालामुळे पवार कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

या निकालाकडे राज्यभरातील कायदा व न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिले जात असून, पोलीस कोठडीत आरोपींच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील उत्तरदायित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.