विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! शाळा-महाविद्यालयांजवळ खुलेआम गुटखा आणि सिगारेट विक्री

16 Jun 2026    92 Views

ज्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठीचे धडे दिले जातात, त्याच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात आज नशेचा बाजार फोफावत असल्याचे चिंताजनक चित्र राजगुरुनगर शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या अवघ्या काही पावलांच्या अंतरावर गुटखा, मावा, सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या भवितव्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कायद्यानुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. या नियमाचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यसनांच्या विळख्यात जाण्यापासून रोखणे हा आहे. मात्र राजगुरुनगरमध्ये या कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळच पानपट्ट्या, टपऱ्या आणि किरकोळ दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे या प्रकाराकडे पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या व्यवसायावर प्रभावी कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांचे मनोबल वाढत आहे. परिणामी, अल्पवयीन विद्यार्थ्यांपर्यंतही तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

शैक्षणिक परिसराला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी शासनाने विविध नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. अनेक शाळांनी ‘तंबाखूमुक्त शाळा’ असे फलक लावून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही महाविद्यालयांमध्ये अशा नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी तंबाखूमुक्त परिसराचे फलकही आढळत नाहीत. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सुरू असलेल्या या विक्रीविरोधात आजपर्यंत कोणतीही मोठी किंवा कायमस्वरूपी कारवाई झालेली नाही. एखाद्या पानपट्टीवर किंवा स्टॉलवर कारवाई झाल्याची उदाहरणे अत्यंत दुर्मिळ आहेत. अधूनमधून तपासणी मोहिमा राबवल्या जात असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे कारवाई केवळ कागदोपत्री आणि दिखाव्यासाठीच केली जाते का, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बेकायदा विक्रीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी गुटख्याची उघड विक्री कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. काही विक्रेते आता केवळ ओळखीच्या ग्राहकांनाच गुप्तपणे विक्री करत असल्याची चर्चा आहे. यावरून प्रशासनाची इच्छाशक्ती असेल तर अशा बेकायदा व्यवसायांवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे स्पष्ट होते.

राजगुरुनगरमधील काही शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केले आहेत. एका विद्यालयाने ‘तंबाखूमुक्त शाळा’ असा फलक लावण्याबरोबरच ‘प्रहारी क्लब’ स्थापन केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर व्याख्याने, समुपदेशन सत्रे आणि व्यसनमुक्तीविषयक जनजागृती कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.

मात्र केवळ जनजागृती करून हा प्रश्न सुटणार नाही. शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील बेकायदा विक्रीवर कठोर कारवाई करणे, संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द करणे आणि नियमित तपासणी मोहीम राबवणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके असण्याऐवजी व्यसनाची साधने पोहोचण्याचा धोका अधिक वाढत जाईल, अशी भीती पालक आणि नागरिक व्यक्त करत आहेत.