बोरिवलीत माकडामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत लोकल सेवा काही काळ ठप्प, प्रवाशांचा खोळंबा
03 Jul 2026 923 Viewsमुंबई :मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच बोरिवली रेल्वे स्थानकात घडलेल्या एका अनोख्या घटनेने पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील रेल्वे रुळावर माकड बराच वेळ बसून राहिल्याने सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाला गाड्या थांबवाव्या लागल्या. परिणामी पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे प्रभावित झाली, तर दोन ते तीन लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या. दुसरीकडे, गेल्या २४ तासांत शहरात अनेक ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाल्याने सखल भागांत पाणी साचून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
रुळावर माकडाचा ठिय्या; लोकल सेवा काही काळ ठप्प
बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील रेल्वे रुळावर अचानक माकड येऊन बसल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. माकड रुळावरून हटत नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने काही लोकल गाड्या थांबविण्यात आल्या. यामुळे बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या दोन ते तीन लोकल गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर अनेक गाड्या विलंबाने धावल्या.
अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांनी घटनास्थळी धाव घेत माकडाला सुरक्षितपणे रुळावरून हटवले. त्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या प्रकारामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत
दरम्यान, गेल्या २४ तासांत मुंबईतील अनेक भागांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले. अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने तेथील वाहतूक वळवावी लागली. काही प्रमुख रस्त्यांवर वाहने संथ गतीने धावत असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
हार्बर मार्गावरही अडथळा; ओव्हरहेड वायर तुटल्याने सेवा प्रभावित
पावसाचा फटका केवळ पश्चिम रेल्वेलाच नाही, तर हार्बर मार्गालाही बसला. पहाटे ४.५२ ते ५.४५ या कालावधीत ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली. तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर रेल्वे सेवा हळूहळू पूर्ववत करण्यात आली.दरम्यान,मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवा काही प्रमाणात विलंबाने सुरू होत्या. मात्र, बेस्टची बससेवा नियमित सुरू असल्याने अनेक प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा दिलासा मिळाला.हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील काही दिवसही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कामांशिवाय घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, तसेच वाहतूक आणि हवामानाशी संबंधित अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.