आई-मुलीच्या नात्याची भावनिक कहाणी अन् डिजिटल धोक्यांवर भाष्य; कसा आहे 'मर्दिनी'?

04 Jul 2026    96 Views

सायबर गुन्हे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डेटा चोरी आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणारे धोके आज प्रत्येक कुटुंबासमोर उभे आहेत. या वास्तवाला एका आई-मुलीच्या भावनिक नात्याची जोड देत 'मर्दिनी' हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येतो. श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे निर्मित, तर अजय मयेकर दिग्दर्शित हा चित्रपट मनोरंजनासोबतच समाजाला महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो.

मुंबईतील चाळीत राहणारी अंजली घोरपडे (प्रार्थना बेहरे) ही आपल्या आई आणि लाडक्या मुलगी ओवीसोबत साधं, सुखी आयुष्य जगत असते. मात्र एका अनपेक्षित घटनेनंतर तिच्या आयुष्याला धक्कादायक वळण मिळते. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आणि संकटाचा सामना करण्यासाठी ती उभी राहते. त्यानंतर उलगडत जाणारं कथानक थरार, भावना आणि सामाजिक वास्तव यांचा समतोल साधत पुढे सरकतं.

प्रार्थना बेहरेने आईच्या भूमिकेतील असहायता, माया आणि संघर्ष प्रभावीपणे साकारला आहे. अभिजित खांडकेकर आपल्या भूमिकेत लक्ष वेधून घेतो, तर जितेंद्र जोशी कमी वेळ पडद्यावर दिसूनही प्रभावी ठरतो. बालकलाकार मायरा वैकुळने निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

दिग्दर्शक अजय मयेकर यांनी पहिल्याच चित्रपटात संवेदनशील विषय हाताळताना कथेला अनावश्यक नाट्यमयतेपासून दूर ठेवले आहे. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी कथा वास्तववादी वाटते. हितेश मोडक यांचे संगीत, दमदार पार्श्वसंगीत आणि शब्बीर नाईक यांचे छायाचित्रण चित्रपटाची परिणामकारकता वाढवते. सुरुवात थोडी संथ असली तरी पुढे चित्रपट वेग घेत प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.

'मर्दिनी' हा केवळ आई-मुलीच्या नात्याचा चित्रपट नाही; तो डिजिटल युगातील वाढत्या धोक्यांविषयी समाजाला सावध करणारा, भावनिक आणि विचार करायला भाग पाडणारा सिनेमा आहे. मनोरंजनासोबत आशय शोधणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा ठरतो.