अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली ३४ दशलक्ष वर्षांपासून दडलेले प्राचीन जग उघड; शास्त्रज्ञांचा मोठा शोध

03 Jul 2026    99 Views

नवी दिल्ली :/ शास्त्रज्ञांनी पूर्व अंटार्क्टिकाच्या जाड बर्फाच्या थराखाली तब्बल ३४ दशलक्ष वर्षांपासून अबाधित राहिलेला प्राचीन भूभाग शोधून काढला आहे. हा शोध पृथ्वीच्या भूगर्भीय इतिहासासोबतच भविष्यातील हवामान बदल समजून घेण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

उपग्रहांद्वारे प्राप्त झालेला डेटा आणि अत्याधुनिक रेडिओ इको साउंडिंगतंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधकांनी सुमारे ३२ हजार चौरस किलोमीट क्षेत्राचा सविस्तर नकाशा तयार केला. या अभ्यासातून खोल नदीखोरे, उंच पर्वतरांगा आणि विस्तीर्ण पठारांनी बनलेला एक अखंड प्राचीन भूभाग उघड झाला आहे.

सामान्यतः हिमनद्या सरकत असताना त्यांच्या खालील खडकांचे मोठ्या प्रमाणावर अपरदन होते. मात्र, पूर्व अंटार्क्टिकामधील हा भूभाग संथ गतीने सरकणाऱ्या थंड बर्फाच्या थराखाली सुमारे३४ दशलक्ष वर्षे आश्चर्यकारकरीत्या सुरक्षित राहिला असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

संशोधकांच्या मते, हा भूभाग त्या काळाची साक्ष देतो, जेव्हा अंटार्क्टिका बर्फाने झाकलेला नव्हता. त्याऐवजी हा प्रदेश दाट जंगले, समृद्ध वनस्पती आणि तुलनेने उबदार हवामानासाठी ओळखला जात होता.

या शोधामुळे पृथ्वीवरील हवामानातील ऐतिहासिक बदलांचा मागोवा घेण्यास मदत होणार असून, भविष्यातील हवामान बदलांचा अंदाज अधिक अचूकपणे वर्तवता येणार आहे. बर्फाखालील भूभागाचा आकार आणि रचना हिमाच्छादनाच्या हालचालीवर थेट परिणाम करतात. खोल दऱ्या वितळणाऱ्या बर्फाला समुद्राकडे वेगाने वाहून नेण्यास कारणीभूत ठरू शकतात, तर उंच पठारे बर्फाचा प्रवाह नियंत्रित करून हिमसाठा स्थिर ठेवण्यास मदत करतात.

हवामान बदलामुळे जागतिक तापमान सातत्याने वाढत असताना, बर्फाखाली दडलेला हा प्राचीन भूभाग शास्त्रज्ञांसाठी पृथ्वीच्या भूतकाळाची माहिती देणारा आणि भविष्यातील समुद्रपातळी तसेच हिमाच्छादनातील बदल समजून घेण्यासाठी महत्त्वाचा ठेवा ठरत आहे.