तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईचा परिणाम? आहिल्यानगरात दुकानांतून सुटे खाद्यतेल अचानक गायब!

15 Jun 2026    93 Views

अहिल्यानगर : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध आणि औषधांविरोधातील कारवाईला मोठा वेग आला आहे. या कारवाईचे पडसाद आता ग्रामीण भागातही दिसू लागले असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात किराणा दुकानांमधून सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून, "आतापर्यंत आपण नेमकं कोणतं तेल वापरत होतो?" असा प्रश्नही अनेकजण उपस्थित करत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील किराणा दुकानांमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार अर्धा लिटर, एक लिटर किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात सुटे खाद्यतेल विकले जात होते. आर्थिकदृष्ट्या परवडणारा पर्याय म्हणून अनेक कुटुंबे या तेलाचा वापर करत होती. मात्र गेल्या महिनाभरात परिस्थितीत मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. आता बहुतांश दुकानदार ग्राहकांना केवळ कंपनी पॅक असलेल्या खाद्यतेलाच्या पिशव्या किंवा डबेच देत आहेत. एक, पाच किंवा दहा लिटरच्या पॅकमध्येच तेल उपलब्ध करून दिले जात असल्याने सुट्या तेलाची विक्री जवळपास थांबली आहे.

स्थानिक पातळीवर याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या भेसळविरोधी कारवाईमुळे दुकानदार आणि पुरवठादारांमध्ये धास्ती निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता अनेक व्यापाऱ्यांनी सुट्या तेलाची विक्री बंद केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबतही ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. अनेकांनी तेलाच्या चवीत आणि गुणवत्तेत बदल जाणवत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पूर्वी विकल्या जाणाऱ्या सुट्या तेलामध्ये भेसळ तर नव्हती ना, असा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, भेसळयुक्त खाद्यतेलामध्ये पामतेल, ऑर्गेमोन तेल, खनिज तेल, वापरलेले तेल तसेच कृत्रिम सुगंधी द्रव्यांची मिसळ केली जाते. अशा तेलाचे दीर्घकाळ सेवन केल्यास हृदयविकार, रक्तदाबाच्या समस्या, रक्ताची घनता वाढणे, त्वचारोग, अपचन आणि गंभीर प्रकरणांमध्ये हार्ट अटॅकसारखे परिणाम होऊ शकतात. विशेषतः हॉटेल्स, फास्ट फूड सेंटर, लग्नसमारंभ आणि मोठ्या भोजन कार्यक्रमांमध्ये अशा तेलाचा वापर होत असल्याचे यापूर्वीच्या तपासांत समोर आले आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेमुळे आता खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत ग्राहक अधिक जागरूक होत असून, बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. भेसळमुक्त अन्नाचा प्रश्न आता केवळ आरोग्याचा नाही, तर जनजागृतीचा विषय बनला आहे.