मीरा-भाईंदरमध्ये भीषण दुर्घटना नारळाचं झाड कोसळून माजी उपनगराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

04 Jul 2026    910 Views

 

मीरा-भाईंदर : मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 10 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मीरा-भाईंदरमध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. भाईंदर पश्चिमेतील राई गावात धावत्या स्कूटीवर नारळाचे झाड कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या राहुल अशोक पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राहुल हे माजी उपनगराध्यक्ष अशोक बळवंत पाटील यांचे पुत्र होते.

बुधवारी दुपारच्या सुमारास राई गाव परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना राहुल पाटील स्कूटीवरून जात होते. त्याचवेळी रस्त्यालगत असलेले नारळाचे झाड अचानक उन्मळून त्यांच्या अंगावर कोसळले. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, पावसाळ्यातील धोकादायक वृक्षांबाबत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राहुल यांच्या निधनामुळे राई गावासह संपूर्ण मीरा-भाईंदर परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, याच मुसळधार पावसामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधील गोल्ड नेस्ट परिसरातही एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले होते. सुदैवाने नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच श्री सिद्धिविनायक सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहतूक थांबवून परिसर सुरक्षित केला, त्यानंतर अग्निशमन दलाने झाड हटवून वाहतूक पूर्ववत केली.

राहुल पाटील यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणात जबाबदारांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित ठेकेदार आणि जबाबदार यंत्रणेविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. धोकादायक अवस्थेतील झाडांची वेळेत पाहणी, छाटणी किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात गंभीर निष्काळजीपणा झाल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप मनसेने केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी केली आहे.

या घटनेची प्रत्यक्षदर्शी स्वप्नाली म्हात्रे यांनीही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसामुळे झाडाच्या मुळांखालची माती वाहून गेल्याने नारळाचे झाड अचानक कोसळले आणि ते थेट राहुल पाटील यांच्या अंगावर पडले. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पावसाळ्यात जीर्ण आणि धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.