मान्सूनच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम? २३ जूनपासून महाराष्ट्रात पावसाची दमदार वाटचाल

20 Jun 2026    99 Views

राज्यातील नागरिक उकाड्याने हैराण झाले असताना आणि शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, 23 जूनपासून नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या उर्वरित भागांकडे पुढे सरकण्याची शक्यता असून राज्यात पावसाची सक्रियता वाढणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या विलंबामुळे निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

पावसासाठी पोषक वातावरण तयार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक वातावरण तयार झाले आहे. यामुळे महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा आणि बिहारच्या उर्वरित भागांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात 22 जूनपासून पावसाची तीव्रता वाढू शकते, असे हवामानतज्ज्ञ सुदीप कुमार यांनी सांगितले आहे.  

मराठवाड्यात खरीप हंगाम संकटात

मान्सूनच्या विलंबाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे 48 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ 10 हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी काही प्रमाणात कापूस आणि इतर पिकांची लागवड केली असली, तरी बहुतांश शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.पावसाअभावी सोयाबीन, तूर, मका, मूग यांसारख्या प्रमुख पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात रखडल्या आहेत. सिंचनाची सोय नसलेल्या शेतकऱ्यांपुढे आर्थिक आणि कृषी संकट उभे राहिले आहे. बीड,[ BEED] जालना [JALNA] यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पेरणीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

एल निनो'चा परिणाम कायम

यंदा 'एल निनो'च्या प्रभावामुळे मान्सूनच्या गतीवर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पुणे आणि आसपासच्या भागांत पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाचे स्वरूप कसे राहील, याचे अधिक स्पष्ट चित्र जूनच्या अखेरीस समोर येणार आहे .सध्या तरी राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष २३ जूनकडे लागले असून, मान्सूनच्या आगमनाने उकाड्यापासून दिलासा मिळण्याबरोबरच खरीप हंगामालाही नवी संजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.