भिवंडीतील विषबाधा प्रकरणाची व्याप्ती वाढली; बाधितांचा आकडा 107 वर, ‘फेमस शोरमा’वर बुलडोझर कारवाई
20 Jun 2026 96 Viewsभिवंडीतील खंडूपाडा परिसरातील ‘फेमस शोरमा’ दुकानातून विकल्या गेलेल्या चिकन शोरमा, पिझ्झा, फालुदा आणि इतर खाद्यपदार्थांमुळे झालेल्या अन्न विषबाधा प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनेतील बाधितांची संख्या आता 107 वर पोहोचली असून सर्व रुग्णांवर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र या घटनेमुळे भिवंडीत मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने संबंधित दुकानाविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
प्रशासनाचा कठोर पवित्रा; दुकानावर तोडक कारवाई
अन्न विषबाधेच्या गंभीर घटनेनंतर भिवंडी महानगरपालिकेने ‘फेमस शोरमा’ दुकानाविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित दुकानावरील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत तोडक कारवाईला सुरुवात केली आहे. यासोबतच परिसरातील इतर अनधिकृत बांधकामांचीदेखील तपासणी करण्यात येत असून त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे.
एफडीएच्या तपासात धक्कादायक माहिती
या घटनेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने दुकानावर छापा टाकला. तपासादरम्यान दुकानाची अधिकृत नोंदणी आणि परवाना मार्च 2026 मध्येच संपुष्टात आल्याचे उघड झाले. तरीदेखील संबंधित व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यात आला होता. यानंतर एफडीएने दुकानाला ‘स्टॉप बिझनेस’ नोटीस बजावत तात्काळ बंद केले.
तपासणीदरम्यान चीज ॲनालॉग, शेझवान चटणी, टोमॅटो डिप सॉस, मेयोनीज, चिकन मिक्स मसाला आणि पिझ्झा बेस यांचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
मालकाविरोधात गुन्हा दाखल
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अन्न विषबाधेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुकानाचे मालक दिलशाद अन्सारी याच्याविरोधात भिवंडीच्या शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफडीए आणि पोलिसांकडून संयुक्तपणे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, महापौर नारायण चौधरी, भाजप आमदार महेश चौगुले तसेच समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत रुग्णांची विचारपूस केली. या घटनेमुळे मोठी जीवितहानी होऊ शकली असती, असे सांगत संबंधितांवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भिवंडीतील या धक्कादायक घटनेमुळे खाद्य सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शहरातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या तपासण्या आता अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.