मुंबई लोकलमध्ये झुरळाची एंट्री अन् महिलांच्या डब्यात उडाला एकच गोंधळ; व्हिडिओ व्हायरल
04 Jul 2026 912 Viewsमुंबई हे शहर महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक मानले जाते. मध्यरात्रीही महिला निर्धास्तपणे प्रवास करू शकतात, अशी मुंबईची ओळख आहे. अनेक विदेशी पर्यटकांनीदेखील मुंबईतील महिला सुरक्षेचे कौतुक केले आहे. मात्र, याच धाडसी मुंबईकर महिलांना एका छोट्याशा झुरळाने चांगलाच घाम फोडल्याचा मजेशीर प्रकार समोर आला आहे. सध्या याच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुंबई लोकलच्या महिलांसाठी राखीव डब्यात अचानक एक झुरळ शिरल्याचे दिसते. झुरळ नजरेस पडताच काही महिलांनी मोठ्याने किंचाळण्यास सुरुवात केली, तर काही जणी घाबरून थेट सीटवर चढून उभ्या राहिल्या. झुरळ अंगावर येईल या भीतीने डब्यात काही क्षण अक्षरशः गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे, एवढ्याशा झुरळाला सहज हाकलता किंवा मारता आले असते. मात्र, त्यासाठी कोणीही पुढे येण्याचे धाडस केले नाही. प्रत्येक जण स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. महिलांच्या या प्रतिक्रिया पाहून डब्यातील इतर प्रवासीही हसताना दिसत आहेत.
व्हिडिओ अपलोड होताच त्याला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले असून सोशल मीडियावर तो वेगाने व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी "सिंहाला घाबरत नाहीत, पण झुरळ पाहिलं की धावाधाव सुरू होते", "झुरळाची एंट्री म्हणजे पूर्ण डब्याची एक्सरसाइज" अशा विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर "महिलांनाच नव्हे, अनेक पुरुषांनाही झुरळाची भीती वाटते," असे म्हणत या घटनेकडे हलक्याफुलक्या नजरेने पाहण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहिला जात असून, महिलांच्या स्वभावावर भाष्य करण्यापेक्षा अनपेक्षित प्रसंगी माणसाकडून कशा नैसर्गिक प्रतिक्रिया उमटतात, याचे हे एक मजेशीर उदाहरण असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन केले असून तो सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय ठरला आहे.