दीड कोटींची इलेक्ट्रिक बस चोरी आरोपीने 20 बस चोरल्याची कबुली दिल्याने खळबळ
03 Jul 2026 922 Viewsएसटीच्या शिवाई ई-बसवर चोरट्याचा डल्ला आरोपीच्या कबुलीजबाबाने पोलिसही चक्रावले
नागपूर : वाहन चोरीच्या घटना नेहमीच समोर येत असतात. मात्र, नागपुरात घडलेली एक घटना पोलिसांसह सर्वसामान्यांनाही हादरवणारी ठरली आहे. चक्क महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे 1 कोटी 53 लाख रुपये किमतीच्या 'शिवाई' इलेक्ट्रिक बसची चोरी करण्यात आली. ही घटना उघडकीस येताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि अवघ्या काही तासांत अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी बससह आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबाने मात्र पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलैच्या मध्यरात्रीनंतर नागपुरातील इमामवाडा बसस्थानकातील चार्जिंग स्टेशनवर एमएच-49/BZ-8258 क्रमांकाची 'शिवाई' इलेक्ट्रिक बस चार्जिंगसाठी उभी होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने बस चोरून तेथून पलायन केले. दुसऱ्या दिवशी बस चोरीची माहिती समोर येताच पोलीस तपासाला लागले.
अमरावतीत बससह आरोपीच्या मुसक्या आवळल्या
दरम्यान, अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याला नंदा मार्केट परिसरात संशयास्पदरीत्या एक इलेक्ट्रिक बस उभी असल्याची माहिती मिळाली. याचवेळी बस चोरणारा संशयित गद्रे चौक परिसरात असल्याचेही पोलिसांना समजले. माहितीची खातरजमा करत राजापेठ पोलिसांच्या डीबी पथकाने तातडीने सापळा रचला आणि बससह आरोपीला ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव विष्णू गणपती नीलावर (वय 23, रा. हयातनगर, जिल्हा रंगारेड्डी, तेलंगणा) असे सांगितले. त्याने नागपुरातील इमामवाडा बसस्थानकातून इलेक्ट्रिक बस चोरी केल्याची कबुली दिली. मात्र, यानंतर त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसही अवाक झाले.आरोपीने आतापर्यंत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील तब्बल 20 बसेस चोरल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे, तर नांदेड बसस्थानकातूनही एक बस चोरी केल्याचे त्याने कबूल केले आहे. या प्रकरणी तेलंगणातील वजिराबाद, सीसीएस, तिरुमला तसेच इतर पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास सुरू केला असून, तो एखाद्या आंतरराज्य वाहनचोरी टोळीशी संबंधित आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. आरोपीने चोरलेल्या बस कुठे नेल्या, त्यांची विक्री केली की त्यांचे सुटे भाग विकले, याचा तपासही सुरू आहे.दरम्यान, इतक्या मोठ्या किमतीची एसटीची इलेक्ट्रिक बस चोरीला जाण्याची घटना परिवहन व्यवस्थेतील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस यंत्रणा करत असून, आरोपीकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.