कल्याणमध्ये विवाहितेचा अमानुष छळ हुंड्यासाठी हात भाजले केस कापून टक्कल केल्याचा आरोप

16 Jun 2026    92 Views

कल्याणच्या वालधुनी परिसरात हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रौर्याची परिसीमा गाठत सासरच्यांनी महिलेला उपाशी ठेवणे, मारहाण करणे, गरम पाण्याने हात भाजणे आणि अखेर जबरदस्तीने तिचे टक्कल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

अफसाना अन्सारी असे पीडित विवाहितेचे नाव असून ती मूळची उल्हासनगरची रहिवासी आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये तिचा विवाह कल्याणमधील वालधुनी परिसरात राहणाऱ्या समीर अन्सारी याच्याशी झाला होता. लग्नावेळी अफसानाच्या कुटुंबीयांनी आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने हुंडा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अफसानाने दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती असतानाही तिला पुरेसे जेवण दिले जात नव्हते. घरातील अन्न फ्रिजमध्ये ठेवून तिला उपाशी ठेवले जात होते. याशिवाय वारंवार मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर गरम पाण्याने तिचे हात भाजल्याचाही आरोप तिने केला आहे. माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तिने हा त्रास दीर्घकाळ सहन केल्याचे सांगितले.

मात्र ७ जून रोजी घडलेल्या घटनेने हा छळ कळसाला पोहोचला. डोक्यात उवा झाल्याचे कारण देत सासरच्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने केस कापण्यास सुरुवात केली. ट्रिमरने केस पूर्णपणे कापता न आल्याने बाहेरून हजाम बोलावून वस्तऱ्याने तिचे टक्कल करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर अफसानाने घरातून पळ काढला आणि बहिणीकडे आश्रय घेतला. त्यानंतर तिने भावाला फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

अफसानाचा भाऊ नीर हसन अन्सारी याने तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पती समीर अन्सारी, सासू शहनाज अन्सारी, नणंद हिना अन्सारी आणि सासूच्या मोठ्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ, मारहाण आणि जबरदस्तीने केस कापल्याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता होत आहे.